राष्ट्रपतींचं अभिभाषण विकसित भारताच्या संकल्पाला अधिक मजबूत करणारं, नवा विश्वास निर्माण करणारं आणि जनतेला प्रेरणा देणारं होतं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देताना ते आज लोकसभेत बोलत होते. गेल्या दहा वर्षात २५ कोटी नागरिक गरिबी रेषेच्या वर आले, या कार्यकाळात गरीबांना चार कोटी घरं मिळाली असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षात बारा कोटी घरांत शौचालय आणि बारा कोटी घरांना नळजोडणी दिली गेली याचा उल्लेखही त्यांनी केला. आधीच्या सरकारच्या काळात निधीचा मोठा अपहार होत असल्याचं सांगत मोदींनी केंद्र सरकारची प्राथमिकता जनता आहे, असं सांगितलं. सरकारने योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवल्या असं त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाचा प्रधानमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. सरकारमधे भ्रष्टाचाराला थारा नसल्याने जनतेचे लाखो कोटी रुपये वाचत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. आयुष्मान योजनेमुळे जनतेची एक लाख वीस हजार कोटी रुपये बचत झाली, जनऔषधी केंद्रामुळे तीस हजार कोटी बचत होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. मोफत अन्नधान्य योजना, मोफत वीज योजनेमुळेही जनतेची कोट्यवधींची बचत होत आहे, असं सांगून १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी रुपये निधीची तरतूद केंद्र सरकारने केली असंही त्यांनी सांगितलं. देश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. भारत डीपटेक क्षेत्रात पुढे जात आहे, आण्विक ऊर्जा क्षेत्र खुलं केलं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
प्रधानमंत्र्यांच्या भाषणानंतर लोकसभेनं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभारप्रस्ताव स्वीकारला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.