पर्यावरण आणि वनहक्क चळवळीतले ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरमधे निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
गडचिरोली लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करुन देणारे मोहन हिराबाई हिरालाल यांच्यावर महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव होता. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते सक्रीय सदस्य होते. १९८४ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी वृक्षमित्र संघटनेची स्थापना केली. गावच्या निर्णयांमधे महिलांचा सहभाग, दारूबंदी, वनसंरक्षण आणि हक्क, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, ग्रामस्वराज, इत्यादी क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं कार्य केलं. त्यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यातलं मेंढा – लेखा गाव सर्वसहभागाने कारभार करणारं गाव म्हणून आकाराला आलं. २००९ मधे सरकारकडून सामुदायिक वनहक्क मिळालेलं ते पहिलं गाव ठरलं. त्यांना जमनालाल बजाज पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि इतर मान्यवरांनी मोहन हिराबाई हिरालाल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.