डोंबिवली इथल्या कारखान्यात झालेला स्फोट आणि इथल्या कारखान्यांद्वारे होणारं प्रदूषण हा मुद्दा आमदार उमा खापरे यांनी विधानपरिषदेत मांडला. या दुर्घटनेतल्या पीडितांना काय मदत देण्यात आली आहे आणि इथलं प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे, असंही त्यांनी विचारलं.
मंत्री दीपक केसरकर यांनी या लक्षवेधीला उत्तर दिलं. या दुर्घटनेतील १३ कामगारांपैकी ११ जणांचा विमा काढलेला असून उर्वरित दोघांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात आले आहेत, असं केसरकर यांनी सांगितलं. या प्रकरणी प्रदूषणाच्या मुद्द्याचा तपास करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे, असंही केसरकर यांनी सांगितलं.
तसेच, सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट जलस्रोतांमध्ये सोडणाऱ्या कारखान्यांचा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडला. यावर अधिक काय करता येईल, याचा विचार करून त्यानुसार संबंधित विभागांना सूचना देऊ, असं आश्वासन मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं.
अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध थकीत देयकं अदा करण्यासाठी विशेष शिबिरं घेण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत केली. किरण सरनाईक यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.