हिजबुल्लाह या लेबनॉनमधल्या दहशतवादी संघटनेनं आज सकाळी इस्रायलवर हल्ला सुरू केला. त्यांचा लष्करी नेता फौद शुकुर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला असल्याचं हिजबुल्लाहनं म्हटलं आहे. ३० जुलै रोजी बैरुत इथं शुकुर याची हत्या झाली होती. हिजबुल्लाहनं इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.
दरम्यान, हिजबुल्लाहनं हल्ला करण्याआधीच आपण शंभर लढाऊ विमानांच्या सहाय्यानं हल्ला केल्याचं इस्रायली लष्करानं म्हटलं आहे. हिजबुल्लाहनं इस्रायलवर मोठ्या हल्ल्याची योजना आखल्याचं लक्षात आल्यामुळे हा हल्ला केल्याचं इस्रायली लष्करानं म्हटलं आहे. इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहची हजारो क्षेपणास्त्रं नष्ट केल्याचं राष्ट्राध्यक्ष बेंजामीन नेत्यान्याहू यांनी सांगितलं. इस्रायल आणि गाझा मध्ये युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच हा संघर्ष सुरू झाला आहे.