वर्ष २०२७ पर्यंत भारत जगात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, आणि या गौरवशाली प्रवासात सहकार मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं व्यक्त केला. राष्ट्रीय सहकारी बँक महासंघाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात शाह बोलत होते. विकासाच्या प्रवासात सहकाराचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं सांगून, देशाच्या प्रत्येक नागरिकाला सामावून घेणारा विकास केंद्र सरकारला अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. महासंघानं प्राथमिक कृषी कर्ज समिती म्हणजेच पॅक्स, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँका या त्रिस्तरीय संरचनेने देशातल्या शेतकरी आणि गावांच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं त्यांनी नमूद केलं. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँका सक्षम, निरोगी रहाण्यासाठी प्राथमिक कृषी कर्ज समित्या निरोगी राहिल्या पाहिजेत यावर भर देतानाच सहकार क्षेत्रात जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारतामध्ये असल्याचंही शाह यांनी नमूद केलं.
Site Admin | November 27, 2024 9:24 AM | Home Minister Amit Shah