दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि भारत राष्ट्र समिती पक्षाच्या के. कविता यांची न्यायालयीन कोठडी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने येत्या ९ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. या तिघांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज न्यायालयात हजर करण्यात आलं.
या प्रकरणात सीबीआयने २९जुलै ला केजरीवाल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. तर राऊस एव्हेन्यू कोर्टानं २२ जुलैला के. कविता यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली होती. या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे. तामिळनाडू, पुडुचेरी, कराई कल, केरळ, आणि दक्षिण कर्नाटकात तसंच उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यांत उद्या अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत मान्सून हळूहळू उत्तरेकडे सरकेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने, दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.