आसाम मधील जोगीघोपा इथे, ब्रह्मपुत्रा नदीवर अंतर्गत जलवाहतुकीस उपयुक्त ठरणाऱ्या राष्ट्रीय जलमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. भूतानचे अर्थमंत्री लियोंपो नामग्याल दोरजी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा टप्पा कार्यान्वित झाल्याबद्दल समाज माध्यमांवरील संदेशातून समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. या प्रदेशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी अंतर्गत जलमार्गांना प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी संदेशात म्हंटलं आहे. हे अत्याधुनिक टर्मिनल भूतान आणि बांगलादेशदरम्यानच्या व्यापारासाठी उपयुक्त ठरणार असून, यामुळे आसाम आणि ईशान्येकडील भागात मालवाहतूक वाढण्याची अपेक्षा आहे.