खेळांमध्ये मुला-मुलींना समान संधी देण्यास प्राधान्य दिलं जाईल, अशी ग्वाही राज्येच क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र क्रीडा संचालयानालयाच्या सहकार्याने पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा क्रीडा संकुलांना दहा कोटी रुपये तर तालुका क्रीडा संकुलांना पाच कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा यावेळी बनसोडे यांनी केली.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. खेळाच्या माध्यमातून समाजात एकता, समता आणि बंधुता रुजवणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. युवा आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनीही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ऑलिम्पिक दिनानिमित्त आज राज्यभरात कार्यक्रम साजरे करण्यात आले. यात आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान, ऑलिम्पिक दौड, हॉकीसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या.