विदर्भात धवलक्रांती घडवण्यासाठी एनडीडीबी, अर्थात राष्ट्रीय दूध उत्पादन विकास महामंडळाद्वारे संचालित मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते आज नागपुरात मदर डेअरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्याचं भूमीपूजन करताना बोलत होते.
मदर डेअरीनं आता पशुवैद्यक तज्ञांच्या मदतीनं स्थानिक गाईंच्या चांगल्या वाणांसाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. दररोज सुमारे १२ ते १५ लिटर दूध देणाऱ्या गाई विकसित केल्या तर महाराष्ट्राला हरियाणा किंवा पंजाब येथील गाई येथे आणण्याची गरज पडणार नाही, असं गडकरी म्हणाले. जिल्हानिहाय पशुधन विकसित करून ते किफायतशीर किमतीमध्ये दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी मदर डेअरीला केली.
मदर डेअरी मार्फत नागपूर येथील सुप्रसिद्ध अशी संत्रा बर्फीचे देखील विपणन होणे आवश्यक आहे. त्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला .