जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतानं ऊर्जा क्षेत्रात व्यापक आणि वैविध्यपूर्ण संबंध स्थापन करायला हवेत, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल केलं. मुंबईत एका माध्यमसंस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गेली अनेक दशकं जागतिकीकरणाच्या फायद्यांबद्दल बोलल्यानंतर जग आज औद्योगिक धोरणं, निर्यातीवर नियंत्रण आणि टॅरिफच्या युद्धासारख्या परिस्थितीशी झगडत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ऊर्जा क्षेत्रात अनुकूल परिस्थिती निर्माण करणं हे भारतासाठी येत्या काही दशकांत महत्त्वाचं धोरणात्मक ध्येय असेल, असं जयशंकर यांनी नमूद केलं. सब का साथ, सब का विकास हे ब्रीद देशाच्या परराष्ट्र धोरणातही लागू होत असून रशिया आणि युक्रेन, इस्रायल आणि इराण, विकसित पाश्चात्य देश आणि दक्षिणेकडचे विकसित देश, तसंच ब्रिक्स आणि क्वाड या दोन्ही बाजूंशी एकाच वेळी संबंध जपणाऱ्या फार मोजक्या देशांपैकी भारत एक आहे, यावर त्यांनी जोर दिला.