ऑनलाइन जुगार आणि सट्टाबाजारावर नियंत्रण आणण्यात सरकारला बऱ्याच प्रमाणात यश आलं असून २०२४ या वर्षात अशा एक हजारापेक्षा जास्त संकेतस्थळांवर बंदी आणली आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. अशा प्रकारच्या कोणत्याही संकेतस्थळाची माहिती मिळताच केंद्र सरकार कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर तत्काळ कारवाई करत असल्याचंही त्यांनी पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांचं प्रशिक्षण सध्या सुरू आहे. त्यातून त्यांचं लक्ष विचलित होऊ नये, म्हणून त्यांना प्रकाशझोतापासून दूर ठेवलं आहे, अशी माहिती विज्ञान – तंत्रज्ञान आणि भूविज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. भारताच्या या पहिल्यावहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि सुधांशू शुक्ला या चौघांची निवड झाली आहे.
दहशतवादाविषयी झीरो टॉलरन्स धोरण राबवल्यामुळे देशातल्या दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, असं केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत सांगितलं. ते एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते. दहशतवादाशी संबंधित घटना तसंच सीमापार कारवायांची चौकशी करता यावी, यादृष्टीनं राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात आल्याचं ते म्हणाले.