देशात तंत्रज्ञानावर कोणत्याही विशिष्ट व्यक्तींची मक्तेदारी असू नये, तर ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावं, तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण व्हावं, हे उद्दिष्ट ठेवून गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. मुंबईत पॅन-आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी परिषदेच्या समारोप सत्रात ते आज बोलत होते.
पुढच्या १० वर्षांमध्ये संपूर्ण जगात मोठे राजकीय, भौगोलिक, आर्थिक बदल घडून येतील आणि येणारी कित्येक वर्षं घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या स्थित्यंतरात भारताचा मोठा वाटा असेल, असं सांगून भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीतून शिक्षण घेतलेल्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून या मोठ्या बदलाला हातभार लावावा, असं आवाहन वैष्णव यांनी केलं.
यूपीआय, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, सेमीकंडक्टर क्षेत्र, फोरजी तंत्रज्ञान, वंदे भारत रेल्वेगाड्या, ‘कवच’ रेल्वे सुरक्षा यंत्रणा इत्यादींचा उल्लेख त्यांनी बोलताना केला. इथेच न थांबता, ‘उत्पादनांचा देश’ म्हणून उभं राहण्याचं आणि जगासमोरच्या समस्यांवर तोडगा काढण्याचं भारताचं लक्ष्य आहे, असं ते म्हणाले.
त्यापूर्वी ठाण्यात बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येणाऱ्या बोगद्याच्या बांधकामाचा आढावा अश्विनी वैष्णव यांनी घेतला. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई, ठाणे, सूरत आणि अहमदाबादसारख्या शहरांच्या आर्थिक घडामोडींमध्ये लक्षणीय वाढ होईल, असं वैष्णव या आढाव्यानंतर म्हणाले.