केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. गृह मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २७व्या बैठकीचं अध्यक्षस्थान ते भूषवणार आहेत. लैंगिक शोषण, महिला अत्याचारांच्या प्रकरणांच्या जलद तपासासाठी जलदगती विशेष न्यायालयांची स्थापन करणं, आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीची अंमलबजावणी, पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्दे, यासह विविध मुद्द्यांवर या परिषदेत विचारमंथन अपेक्षित आहे.
आपल्या पुणे दौऱ्यात अमित शहा जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. तसंच प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्र वितरण तसंच राज्यातील 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण अमित शहा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषेदत याबाबत माहिती दिली.