मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या बिघाडामुळे मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर प्रणाली काल ठप्प झाली होती, ती आता पूर्वपदावर येत आहे. यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये बँकिंग, विमान वाहतूक आणि अन्य सेवा विस्कळीत झाल्या होत्या. भारतातही मुंबई विमानतळावरच्या सेवेला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. विविध विमान कंपन्यांना आपली विमान उड्डाणं रद्द करावी लागली.
अमेरिकेतली सायबर सुरक्षा पुरवणारी कंपनी क्राउड-स्ट्राइकशी या यंत्रणा ठप्प होण्याचा संबंध असल्याचं वृत्त आहे. सुरक्षा तपशील संकलनासाठी कंपनीचा फाल्कन सेन्सर बसवलेल्या विविध व्यावसायिक यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याचं कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यासंदर्भात मायक्रोसॉफ्ट आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांच्या संपर्कात असल्याचं, केंद्रिय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सांगितलं.
दरम्यान, मायक्रोसॉफ्ट यंत्रणा बिघाडाचा केवळ 10 बँका आणि वित्तीय संस्थांच्या कामकाजावर किरकोळ परिणाम झाल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशातल्या बहुतांश बँकांच्या महत्त्वाच्या संगणकीय यंत्रणा क्लाउड काम्प्युटिंगचा वापर करत नाहीत. मोजक्या बँकाच ही यंत्रणा वापरत असल्यामुळे त्यांच्या कामकाजावर थोडा परिणाम झाला – अशी माहिती, बँकेनं दिली आहे.