म्हाडातर्फे मुंबईतल्या २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतल्या ३७० सदनिकांच्या विक्री किमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी केल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज दिली. सुलभ जनसंवादाच्या उद्देशाने म्हाडाने तयार केलेल्या शुभंकर चिन्हाचं अनावरण आज सावे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.
या सदनिका विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) आणि ३३ (७) तसंच ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे किमती कमी केल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली. तसंच, सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रियेला १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याचंही मंत्री सावे यांनी म्हटलं आहे.