भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, यानम आणि रायलसीमा या भागात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, लक्षद्वीप लगतच्या आग्नेय अरबी समुद्राचा उत्तरेकडील भाग आणि नैऋत्य अरबी समुद्रावर आज वादळी हवामानाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, या भागात मच्छीमारांनी जाण्याचं टाळावं असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, पुढील 3 दिवसांत देशाच्या वायव्य भागातील किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.