महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करुन आपापल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर ज्येष्ठ नेते राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत.
भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी चिमूर येथे, त्यानंतर सोलापूर आणि संध्याकाळी पुण्यात प्रचारसभा घेतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज मुंबईत दोन सभा होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लातूर जिल्ह्यात देवणी इथं सभा झाली. त्या परिसरातल्या रस्ते आणि दळणवळण विषयक कामांची माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली.
यानंतर ते बीड, जालना आणि नागपूर येथे प्रचार करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ अकोला, अमरावती आणि नागपूर इथे सभा घेणार आहेत. भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा डहाणू, विक्रमगड, पेण, शीव-कोळीवाडा आणि कल्याण इथं होणार आहेत.