नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक स्तरावर प्रशंसा झालेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचं उदाहरण देऊन या उपक्रमाला प्रसारमाध्यमं लोक चळवळ बनविण्यात मदत करू शकतात असं पंतप्रधानांनी सांगितलं.
‘विकसीत भारत’च्या आगामी २५ वर्षांच्या प्रवासात वर्तमानपत्रं आणि मासिकांची महत्वाची भूमिका असल्याचं नमूद करत लोकांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देत असल्याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांचं कौतुक केलं. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवर’चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.