“शांतता राखण्यात महिलांचा सहभाग: एक जागतिक दक्षिण दृष्टीकोन” या विषयावर उद्यापासून नवी दिल्लीत होणाऱ्या परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत सहभागी असलेल्या महिला शांतीरक्षक सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि CUNPK अर्थात, संयुक्त राष्ट्रांचं शांतीस्थापना केंद्र यांनी संयुक्तपणे या दोन दिवसांच्या ही परिषदेचं आयोजन केलं आहे. शांती मोहिमेत ग्लोबल साऊथमधल्या ३५ देशांमधून सैन्य योगदान देणाऱ्या महिला शांतीरक्षक या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांचं प्रमुख भाषण होणार आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या शांती कार्य विभागाचे अवर सचिव, जनरल जीन-पियरे लॅक्रोइक्स आणि संयुक्त राष्ट्रांचे विशेष समन्वयक ख्रिश्चन सॉन्डर्स हे संयुक्त राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करणार आहेत. परिषदेत सहभागी होणाऱ्या महिला शांतीरक्षक, नवीदिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत.