महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरी जाणार असून तिन्ही घटकपक्ष एकत्र बसून जागावाटपावर चर्चा करतील, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीत काँग्रेसचं संघटन मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा आणि त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा पराभव झाला आहे.
महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीतही राज्यातल्या महाभ्रष्ट महायुती सरकारला सत्तेपासून दूर करेल, असा निर्धार या बैठकीत केल्याचं वेणुगोपाल यांनी नमूद केलं. के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेते उपस्थित होते.