राज्यातल्या बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी उद्या पुण्यात बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन केल्याची माहिती पणन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. या परिषदेत राज्यातल्या सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव सहभागी होणार आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळानं ही परिषद बाणेरमधल्या बंटारा भवन इथं आयोजित केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, हेही या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
राज्यातल्या ३०५ बाजार समित्या आणि त्यांच्या ६२३ उप बाजारांच्या माध्यमातून शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत कालानुरूप बदल घडविणं, शेतमालाच्या विपणनामध्ये आधुनिक बाबींचा अंगीकार करणं, शेतकरी आणि इतर सर्व बाजार घटकांना द्यायच्या सोई-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाय योजना आदी विषयांसंदर्भात या परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे.