सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतलं तरच आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होईल, असं प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी केलं. नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत संमेलनाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या सत्रात त्या काल बोलत होत्या.
मराठी भाषेच्या विकासासाठी दहावीपर्यंतचं शिक्षण मराठीतूनच होण्याची गरज भवाळकर यांनी व्यक्त केली. मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी मराठी लिहिणारी, बोलणारी, मराठीत व्यवहार करणारी माणसं वाढणं गरजेचं असल्याचंही त्या म्हणाल्या. मराठी साहित्य संमेलनाच्या सुरुवातीच्या दिवसांत ते विशिष्ट वर्गाचं होतं हे मान्य करत आता संमेलनाची व्याप्ती वाढत आहे, असं भवाळकर यांनी नमूद केलं. मराठी भाषेच्या विकासात निरक्षर, परंपरेतून शहाणपण आलेल्या लोकानी मोठं योगदान दिलं असून साक्षरतेच्या जोडीला शहाणपण नसेल तर काही उपयोग नाही, असं त्यांनी सांगितलं.
याप्रसंगी मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे यांनीही आपले विचार मांडले. अध्यक्षपदाची सूत्रं तारा भवाळकर यांच्याकडे सोपवताना कृतार्थ वाटतं असं ते म्हणाले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार उपस्थित होते.