प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा एकशे विसावा भाग होता. आपल्या सणांतून दिसणारी एकतेची भावना आपल्याला सतत्यानं बळकट करायची आहे असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्रातल्या गुढीपाडव्यासह, देशभरात विविध ठिकाणी येत्या काही दिवसात नववर्षाच्या स्वागतासाठी साजऱ्या होणार असलेल्या रोंगाली बिहू, पोईला बोइशाख, नवरेह सणाच्या, तसंच ईदच्याही शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यानिमित्तानं प्रधानमंत्र्यांनी त्यांना विविध भाषांमध्ये आलेले शुभेच्छा संदेशही वाचून दाखवले.
परीक्षा संपून लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आणि युवा वर्गानं नवी कौशल्ये शिकावीत यावर त्यांनी आजच्या मन की बात मध्ये भर दिला. या काळात मुलांनी तंत्रज्ञान, नाट्यकला, पर्यावरणासह विविध विषयांवरची शिबीरं तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. कोणत्याही संस्था, शाळा अथवा विज्ञान केंद्रांनी आयोजित केलेल्या उन्हाळी उपक्रमांची माहिती MyHolidays या हॅशटॅगसह सामायिक करावी असं आवाहनही त्यांनी केलं. या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या MY-Bharat या दिनदर्शिकेची माहिती दिली.
उन्हाळा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये जल संवर्धनावरही भर दिला. यानिमित्तानं त्यांनी कॅच द रेन या मोहीमेची माहिती दिली. ही मोहीम सरकारची नसून समाजाची, जनता जनार्दनाची मोहीम आहे, असं त्यांनी सांगितलं. या मोहीमेअंतर्गत गेल्या ७ ते ८ वर्षांत पावसामुळे वाहून जाणारं ११ अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आल्याची माहिती दिली. या मोहीमेअंतर्गत विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. सामुदायिक पातळीवर जलसंवर्धनाच्या मोहिमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. यासोबतच उकाडा वाढत असल्यानं पक्ष्यांसाठी पाण्याचं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
अलिकडेच झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचीही प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली. या खेळाडूंनी आपल्या प्रतिभेनं पुन्हा एकदा आश्चर्यचकीत करत १८ राष्ट्रीय विक्रम मोडले, यांपैकी १२ विक्रम महिला खेळाडूंनी केल्याची माहिती त्यांनी दिली.
यानिमित्तानं तंदुरुस्तीविषयी बोलतांना त्यांनी दिल्लीमध्ये आयोजित फिट इंडिया कार्निव्हलविषयी सांगितलं. आपापल्या परिसरात अशा प्रकारचे कार्निव्हल आयोजित करण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला केवळ १०० दिवस उरले असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी करून दिलं. एक वसुंधरा, एक आरोग्यासाठी – योग ही यंदाच्या योग दिनाची कल्पना आहे अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय योग दिन ही भारतानं जगाला दिलेली अनमोल भेट आहे असं ते म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी सर्वांना आपल्या दिनचर्येत योगाभ्यासाचा अंतर्भाव करण्याचंही आवाहन केलं, तसंच जगभरात योगाभ्यासाच्या प्रचार प्रसारासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी जगभरात भारतीय समुदाय आपल्या सांस्कृतिक संवर्धनासाठी करत असलेल्या कामांची उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. यानिमित्तानं त्यांनी आपल्या मॉरीशस दौऱ्यानिमित्त मुंबईतल्या आर्यश लीखासह अनेकांनी व्यक्त केलेल्या भावना प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांशी सामायिक केल्या.
पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असलेल्या टेक्स्टाईल वेस्ट अर्थात कपड्यांपासून निर्माण होत असलेल्या कचऱ्यांच्या नव्या आव्हानाविषयी देखील प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. असा कचरा निर्माण करण्यात आज भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची जाणिव त्यांनी श्रोत्यांना करून दिली. मात्र यावरही अनेक स्टार्टअप्स आणि संस्था उपाय शोधत आहेत, शाश्वत फॅशन आणि कचरा व्यवस्थापनासाठी अभिनव पद्धतीनं काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं.