माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल जागतिक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.. आर्थिक प्रगती आणि मुत्सद्देगिरीमध्ये त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानाचं स्मरण करून त्यांनी आदरांजली वाहिली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी भारत-अमेरिका संबंधांचे एक महत्त्वाचे शिल्पकार म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मरण केलं असून, दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीतल्या महान नेत्यांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला द सिल्वा यांनी भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका संवाद मंच आणि ब्रिक्स गट स्थापन करण्यात मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण केलं आहे.
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे की, भारतानं आपला एक गुणवान पुत्र गमावला आहे. डॉ. सिंग अफगाणिस्तानच्या जनतेचे दृढ मित्र होते, असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
डॉ मनमोहन सिंग हे मालदीवचे दयाळू पिता आणि प्रिय मित्र होते, असं मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद, यांनी म्हटलं आहे.
भारतातले रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे की, भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांमध्ये डॉ.मनमोहन सिंग यांचं योगदान अतुलनीय असून, भारत आणि रशियासाठी हा अत्यंत दुःखाचा क्षण आहे.
डॉ. मनमोहन सिंग हे एक दूरदर्शी नेते आणि सच्चे राजकारणी होते, भारताच्या विकासात आणि जागतिक मुत्सद्देगिरीमधलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील, असं नेपाळचे परराष्ट्र मंत्री डॉ. अर्जू राणा देउबा यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.
फिनलंड, कोरिया आणि नॉर्वेच्या भारतातल्या राजदूतांनीही समाज माध्यमावर संदेशाद्वारे डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.