माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. डॉ सिंग हे अशा दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक होते, ज्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही विश्वात आपला ठसा उमटवला, असं राष्ट्रपतींनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. डॉ. मनमोहन सिंग हे भारताच्या आर्थिक परिप्रेक्ष्यात परिवर्तन घडवणारे असामान्य अर्थतज्ञ होते, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं.
डॉ. सिंग यांनी आपल्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी केलेल्या व्यापक प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.
डॉ.मनमोहन सिंग यांनी आरबीआयचे गव्हर्नर ते अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. डॉ. सिंग यांच्या नेतृत्वानं पक्षपातळीवर प्रशंसा आणि आदर मिळवला असून, त्यांचा वारसा पिढ्यानपिढ्या राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणा देत राहील, असं भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. डॉ.सिंग यांचं नेतृत्व, नम्रता आणि समर्पण सदैव स्मरणात राहील, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
भारतानं एक दूरदर्शी राजकारणी, अभेद्य एकतेचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थतज्ञ गमावल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी असामान्य शहाणपण आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं. त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यामुळे देशाला प्रेरणा मिळाली, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त केला आहे. भारताचे अर्थमंत्री म्हणून सर्वात आव्हानात्मक काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून यशस्वीपणे पुढे नेलं आणि जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा पाया घातला, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, कॅबिनेट मंत्री रामदास आठवले यांनी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.