मणिपूरमधे शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होण्यासाठी तिथल्या लोकांनी एकत्र काम केलं पाहिजे, असं आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे. गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं एक शिष्टमंडळ आज हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर गेलं होतं. गवई यांनी विक्रम नाथ, एम एम सुंद्रेश आणि के व्ही विश्वनाथन यांनी छुराचांदपूर जिल्ह्यातल्या मदत छावणीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय राज्यघटनेनं सर्व नागरिकांना समान अधिकारांची हमी दिली आहे, असंही ते म्हणाले.
गवई अध्यक्ष असलेल्या नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने मणिपूरमधल्या विस्थापितांसाठी आणखी अडीच कोटी मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. मे २०२३ पासून इंफाळ खोऱ्यात मेईती आणि लगतच्या डोंगराळ भागात कुकी-झो गटांमधल्या वांशिक हिंसाचारात अडीचशेहून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो बेघर झाले आहेत.