शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा, असं आवाहन ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत रसाळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबाबत अभिरुची निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले. लहानपणापासून मुलांना जर वाचायची सवय लावली, विद्यार्थ्याला, त्याचे अभिरुची जर शाळेच्या अभ्यासक्रमातून घडवली, तर चांगला अभिरुची संपन्न असा एक शिक्षित समाज आपण घडवू शकतो.
दुर्दैवानं मराठी शिक्षण पद्धतीमध्ये हे फारसं होताना दिसत नाही. प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक या वर्गांमध्ये भाषिक शिक्षण दिलं जावं. पण माध्यमिक स्तरावर म्हणजे आठवीपासून शालांत परीक्षेपर्यंत जी पाठ्यपुस्तकं आहेत, त्यामध्ये निवड ही अभिरुची वाढेल या दृष्टीने करावी. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी डॉ रसाळ यांची घेतलेली ही मुलाखत आकाशवाणीवरून आज आणि उद्या अशा दोन भागात सकाळी साडे अकरा वाजता, प्रसारित केली जाणार आहे.