डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मविआचं आंदोलन

महाराष्ट्रात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत आंदोलन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्विराज चव्हाण, आमदार भाई जगताप, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात जमून सरकारचा निषेध केला. तिथून मोर्चा काढून गेटवे ऑफ इंडियापर्यंत गेले आणि तिथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांनी आंदोलन केलं. मालवणला पुतळा उभारण्यात झालेल्या भ्रष्टाचारामुळे तो पुतळा पडला, त्याचा अपमान झाला, म्हणून हे आंदोलन करत असल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली. मालवणला घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा अभिमान यांचा अपमान केंद्र आणि राज्य सरकारने केल्याची टीका नाना पटोले यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाबद्दल मागितलेली माफी मग्रूरीने मागितलेली असून ती आम्हाला मान्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मोठा बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, नांदेडमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा