राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महिलांवर अत्याचार होत आहेत, राजकीय नेते सुरक्षित नाहीत मग जनतेच्या सुरक्षेचं काय? असं म्हणाले.
देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या प्रशासनाचा एक वेगळा दबदबा होता मात्र सध्याच्या सरकारनं हा नावलौकिक धुळीला मिळवला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यावेळी केली. राज्य सरकारनं गेल्या दोन तीन महिन्यात अनेक निर्णय घेतले, या निर्णयांची अंमलबजावणी होणं शक्य आहे का? असा सवाल त्यांनी केला.
राज्यात दररोज ७ शेतकरी आत्महत्या करीत आहेत त्याची दखलही राज्य सरकार घेत नसल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला केंद्राचं पथक आंध्र प्रदेशात गेलं मात्र महाराष्ट्रात आलं नाही असा उल्लेख त्यांनी केला.