राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देश आदरांजली वाहत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत गांधी स्मृती इथे आज संध्याकाळच्या सर्वधर्मीय प्रार्थनासभेत भाग घेतला. तेव्हाच्या बिर्ला हाऊस तर आता गांधी स्मृती म्हणून परिचित असलेल्या या जागीच आजच्या दिवशी गांधीजींची हत्या झाली होती. हुतात्मा दिन म्हणून आजचा दिवस पाळण्यात येतो. नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी सकाळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनीही समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख तसंच संरक्षणदल प्रमुखही यावेळी उपस्थित होते.
‘महात्मा गांधींचे आदर्श देशवासियांना विकसित भारताची उभारणी करण्यासाठी प्रेरणा देतील’, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केलं आहे.
सत्य, अहिंसा, सर्वोदय आणि सर्वधर्मसमभाव याबद्द्ल महात्मा गांधींचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.