भारतीय रिपल्बिकन पक्ष – आठवले गटाच्या विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी या विधानसभा निवडणुकीत आपण भाजपाला सहकार्य करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी यासंदर्भात पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पत्र पाठवलं आहे. भाजपासोबत गेल्या दहा वर्षांपासून युती असतानाही, रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळत नाही, भाजपानं लोकसभा आणि विधानसभेतही पक्षाला एकही जागा सोडली नाही, अनेक महामंडळांवरच्या नियुक्त्या, राज्यपाल नियुक्त आमदार यातही पक्षाचा विचार केला गेला नाही यामुळे रिपब्लिकन समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. दलित आणि आदिवासी समाजाच्या जिव्हाळ्याचे असलेले सामाजिक न्याय विभाग, आदिवासी कल्याण विभाग महायुतीच्या काळात उध्वस्त झाल्याचा आरोपही थुलकर यांनी केला आहे.
Site Admin | November 2, 2024 6:48 PM | Maharashtra Vidhansabha Election 2024