विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडण्यास अद्याप प्रारंभ झाला नसला तरी आरोपांच्या फुलबाज्या उडण्यास सुरुवात झाली आहे.
महत्त्वाचे राजकीय प्रश्न हाताळण्यात सत्ताधारी महायुतीला अपयश आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. महाविकास आघाडीकडे विकासाची दिशा आहे आहे. त्यामुळेच आम्ही राज्यात परिवर्तन घडवून आणू शकतो, असा विश्वासही पवारांनी यावेळी व्यक्त केला. सिंचन घोटाळ्याचा आम्ही उल्लेखही केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत आर. आर. पाटील अतिशय निर्मळ मनाचे राजकीय व्यक्तीमत्व होते, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने राट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचनाच्या प्रश्नावरून १० वर्षे ब्लॅकमेल केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. तर महाराष्ट्रात नवे उद्योग कोणते आले आहेत ते दाखवा असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारला केला आहे.
याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याचे म्हटलं आहे. आपण शिवसेना वाचवण्यासाठी भाजपसोबत आल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
मुंबईच्या माहीम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र माहीमची उमेदवारी जाहीर करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. माहीममध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनीही आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
वरळीतील भाजपच्या उमेदवार शायन एन सी यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केला.