राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना सरकारनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत ही मंजूरी देण्यात आली. यात पंढरपूरमधे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप आणि दर्शन रांगेची सुविधा निर्माण करण्यासाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
त्याशिवाय जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथल्या मंगळग्रह देवस्थानासाठी २५ कोटी, सातारा जिल्ह्यात कोयना जलाशय-मौजे मुनावळे इथल्या जलक्रीडा पर्यटन सुविधेसाठी ४७ कोटी, अमरावती जिल्ह्यात दर्यापूर इथं संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन विकासाकरता १८ कोटी, बीड जिल्ह्यात गहिनीनाथ गडासाठी २ कोटी ६७ लाख, मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या दहशतवाद्याला पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिल्ह्यातल्या केंडबे गावी स्मारक उभारण्यासाठी १५ कोटी, नागपूर शहरात लक्ष्मीनारायण शिवमंदिर- नंदनवनासाठी २४ कोटी ७३ लाख, कुत्तेवालेबाबा मंदिर आश्रम -शांतीनगरसाठी १३ कोटी ३५ लाख, तर मुरलीधर मंदिरासाठी १४ कोटी ३९ लाख रुपयांच्या तरतुदीला समितीनं मान्यता दिली.
नाशिक जिल्ह्यात भगूर इथं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्कसाठी चाळीस कोटी रुपयांच्या प्रस्तावाला, तसंच पहिल्या टप्प्यातल्या १५ कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली.
या तीर्थस्थळं आणि पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीनं नियोजन करावं, या सर्व ठिकाणची कामं दर्जेदार होतील याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
मंत्री चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, तसंच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, समाधान अवताडे, सरोज अहिरे आणि वराष्ठ आधिकारी बैठकीला उपस्थित होते.