राज्यातल्या महामार्गांवर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. मुंबईत वरळी इथं परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नियोजित ‘परिवहन भवन’ इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
महामार्गांवर स्वयंचलित वाहतुक नियंत्रण यंत्रणा कार्यरत असून, अपघात कमी होण्यात या यंत्रणेचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळातर्फे, 65 वर्षांवरील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी परवाना धारकांना ‘निवृत्ती सन्मान’ योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान निधीचं वितरण करण्यात आलं.