राज्यात अनेक ठिकाणी अजूनही पावसाचा जोर आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात काल रात्री मुसळधार पाऊस झाल्यानं पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं काही कुटुंबांना निवारागृहात हलवलं आहे. पुरामुळे भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक बंद आहे. मुलचेरा तालुक्यातही दिना नदीला पूर आल्यानं मुलचेरा-आष्टी मार्गही बंद असल्याची माहिती प्रशासनानं दिली. गेल्या चोवीस तासांत भामरागड तालुक्यात १६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पात ९७ टक्क्याहून जास्त पाणीसाठा झाला असून आज धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये यंदा पावसानं सरासरी ओलांडली असून सरासरीच्या ११५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्ह्यातही चांगला पाऊस झाल्यानं मांजरा धरणात पुरेसा जलसाठा झाला आहे. यामुळे लातूर शहरासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. जिल्ह्याच्या मध्यम प्रकल्पात पाणीसाठा वाढल्यानं पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग पिकांचं नुकसान झालं आहे.
सोलापूर जिल्ह्यात पावसाला समाधानकारक सुरुवात झाल्यानं मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या. चांगला पाऊस पडल्यानं उत्पन्नही चांगलं मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र पाऊस उघडीप देत नसल्यानं काढणीला आलेली उडीद, मूग, सोयाबीन, बाजरी ही पीकं वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.