राज्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याखालील सरासरी क्षेत्र 53 लाख 97 हजार हेक्टर इतके आहे. तर कृषी विभागाच्या पीक पेरणीच्या अंतिम अहवालानुसार यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी म्हणजे 64 लाख 83 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
राज्यात पाण्याची उपलब्धता अधिक असल्यामुळे पेरणी क्षेत्र वाढण्यास मदत झाल्याचे पुणे कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. यामध्ये हरभरा पिकाखालील सरासरी क्षेत्र 21 लाख 52 हजार हेक्टरहून वाढून 29 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तसेच गहू आणि मक्याच्या पेरणी क्षेत्रातही भरीव वाढ झाली आहे. तर सरासरी 17 लाख 53 हजार हेक्टरइतके क्षेत्र असताना ज्वारीच्या पेरण्या मात्र 15 लाख 46 हजार हेक्टरवर पूर्ण झाल्या आहेत.
रब्बीत पेरणी झालेल्या 64 लाख 83 हजार हेक्टर पैकी 29 लाख हेक्टर म्हणजे 45 टक्के वाटा हरभरा पिकाचा आहे. यंदा ऊसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्यांखालील क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली. त्यामुळे यंदा उत्पादनातही निश्चित वाढ अपेक्षित आहे. असे पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सांगितले. आकाशवाणी बातम्यासाठी पुण्याहून भूषण राजगुरू.