नागपूर इथं झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विस्तारित मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातेवाटप झाल्यानंतर आज आपापल्या जिल्ह्यात पोचलेल्या मंत्र्यांनी महत्वाच्या योजना आणि कामं मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अहिल्यानगरमधे जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण आण्णा हजारे यांना भेटून त्यांचे आशिर्वाद घेतले. मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अतिशय महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवल्यामुळे कोकणात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली असल्याचं त्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. कृष्णा खोऱ्यातल्या पाणी प्रश्नाबाबतही निश्चित असं धोरण ठरवावं लागेल. बिगर सिंचनाचं वाढतं प्रमाण, शेतीच्या पाण्याचे निर्माण होणारे प्रश्न, पाण्याची उधळपट्टी थांबवणं आणि पाणी सोडण्याच्या वितरण व्यवस्थेत चांगली सुधारणा करणं, यासाठी आता काम करावे लागेल, असं विखे पाटील म्हणाले.
शालेय शिक्षण मंत्री आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे आज मालेगावला गेले, तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना, शालेय शिक्षण खात्यातही प्रभावी कामगिरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गरीबातल्या गरीब मुलांना चांगलं आणि उत्तम शिक्षण देणं हे ध्येय असल्याचंही ते म्हणाले.
समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांसी बोलत होते. बीड आणि परभणी इथं घडलेल्या घटनांचा बारकाईने अभ्यास करून सत्य परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं.
बहुजन विकास, नवीकरणीय ऊर्जा आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोषात स्वागत झालं. त्यानंतर सावे यांची मिठाईनं तुला करण्यात आली.