महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडनवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची माहिती दिली. महायुतीत आतापर्यंत सर्व निर्णय एकत्रितपणे घेतले गेले असून यापुढेही एकत्र राहून निर्णय घेऊ असं भाजपा विधिमंडळ गट नेते देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी सांगितलं.
महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा उल्लेख करत फडनवीस यांनी जनतेचे तसंच भाजपा नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे आभार मानले. नवं सरकार राज्याच्या प्रगतीसाठी काम करेल असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले असून नव्या सरकारमध्येही एकसंधपणे काम करू असं शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी, तसंच विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले.