डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

महाराष्ट्र विधान परिषदेनं स्थापनेपासून आत्तापर्यंत गेल्या १०३ वर्षांमध्ये इथल्या लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम केलं आणि जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले आहेत. त्या आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या सभागृहानं वादविवाद आणि संवादाची परंपरा कायम ठेवून लोकशाही मजबूत केली, असं त्या म्हणाल्या.

 

राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून केली. विधान परिषदेच्या स्थापनेच्या इतिहासाचा उल्लेख करून, या सभागृहाची शोभा वाढवलेल्या समाजसुधारकांना त्यांनी अभिवादन केलं. याच सभागृहाचे सभापती वि. स. पागे यांनी मांडलेली रोजगार हमी योजनेची संकल्पना पुढे मनरेगाच्या रुपानं राष्ट्रीय पातळीवर राबवली गेली, याचं स्मरणही त्यांनी केलं. 

 

भारताची अर्धी लोकसंख्या महिलांची आहे आणि त्यांच्या प्रगतीशिवाय देशाची प्रगती होत नाही, असं राष्ट्रपतींनी सांगितलं. महाराष्ट्राच्या लेकी आणि महिला निश्चितपणे देशाचा गौरव वाढवतील, असं त्या म्हणाल्या. देशाच्या जीडीपीत पहिलं स्थान महाराष्ट्राचं असून महाराष्ट्राची विकासयात्रा अशीच वेगानं पुढे जात राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

 

तत्पूर्वी, ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या विषयावरच्या ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. तसंच २०१८-१९ ते २०२३-२४ पर्यंतच्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर यावेळी उपस्थित होते.

 

मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल सर्व देशवासीयांप्रमाणेच आपल्यालाही खूप वाईट वाटलं, मात्र छत्रपतींचं स्थान सर्व देशवासीयांच्या हृदयात आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. महाराष्ट्र विधिमंडळानं मंजूर केलेले कायदे देशासाठी दिशादर्शक ठरतात, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी सरकारनं आणलेल्या योजनांचा उल्लेख केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा