राज्यातल्या महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर शौचालयं उभी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. या स्वच्छतागृहांची देखभाल, सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी सेवाभावी संस्था किंवा बचत गटांना दिली जाईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. महिला स्वच्छतागृहांची कमतरता असल्याचं सांगत भाजपाच्या चित्र वाघ यांनी ही चर्चा उपस्थित केली होती.
रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ समाधीस्थळाच्या विकासासाठी आवश्यक ती सगळी कामं तातडीनं करण्यात येतील, असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं. रायगड किल्ला आणि जिजाऊ समाधीस्थळ पुनर्विकासाचा एकत्रित आराखडा तयार असून त्यात सिंदखेडराजा इथल्या जिजाऊंच्या जन्मस्थळाचाही समावेश केला जाईल, असं शेलार म्हणाले.