डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्रात पुण्यासह अन्य भागात जोरदार पाऊस, पूरस्थितीमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात काल पुण्यासह अन्य काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या काही भागाला काल पुन्हा जोरदार पावसानं झोडपून काढलं. खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. धरणातून मुठा नदीमध्ये सकाळपासून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग सुरू होता. सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, निंबज नगरसह येरवड्यातील शांतीनगर, आदर्शनगर इथंही पाण्याची पातळी वाढल्यानं अग्निशमन दलानं या भागातील अनेक नागरिकांची सुखरूप सुटका केली. तसंच या परिसरात लष्कराची तुकडीही तैनात करण्यात आली होती.

पुण्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, निवारा, जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पिंपरी चिंचवड शहर तसंच धरण क्षेत्रातल्या संततधार पावसामुळे, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं महापालिका आयुक्तांनी आपत्कालीन यंत्रणेला दक्षतेचे आदेश दिले.

नदीकाठी बचाव यंत्रणा तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या विविध भागातल्या एक हजार नागरिकांना काल निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आलं. राज्याच्या अन्य जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस सुरू असून अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा संबंधित जिल्हा प्रशासनानं दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा