राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर आयोगानं ही कारवाई केली आहे. पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवला आहे. नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या या आदेशाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. पण रश्मी शुक्ला यांना हटवण्यास एवढा उशिर का लागला? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. आता रश्मी शुक्ला यांना निवडणुकीच्या संदर्भातलं कोणतंही काम देऊ नये, असं त्यांनी म्हटलंय.
रश्मी शुक्ला यांच्या बदलीचा निर्णय अतिशय योग्य असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यावरून नाना पटोले यांनी देवेंद्र फडनवीस यांच्यावर बेछूट आरोप केले. मात्र, त्यांना त्याचे पुरावे द्यावे लागतील. पुरावे नसतील तर पटोले यांच्या विरुद्ध आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असं भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी सांगितलं.