कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्य शासन प्रशासकीय कामकाज आणि अर्थव्यवस्थेला गती देत आहे; महाराष्ट्र लवकरच देशाच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते.
देशातली ६० टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. २०३०पर्यंत राज्यातली ५० टक्के वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल असं फडणवीस म्हणाले. शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक इथं जीसीसी पार्क विकसित करणार असून उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी यासाठी आपल्या कल्पना आणि योगदान द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.