डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 22, 2024 1:59 PM | CM Devendra Fadnavis

printer

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं. गृह आणि ऊर्जा खातं तसंच विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त आणि नियोजन तसंच राज्य उत्पादन शुल्क खातं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खाते (सार्वजनिक उपक्रम) देण्यात आलं आहे. जलसंपदा विभागाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे विभागून देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

 

हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण, उदय सामंत यांना उद्योग आणि मराठी भाषा, गिरीश महाजन यांना आपत्ती व्यवस्थापन, चंद्रकांत पाटील यांना उच्च आणि तंत्रशिक्षण तसंच संसदीय कार्य विभाग, गुलाबराव पाटील यांना स्वच्छता आणि पाणीपुरवठा, अदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण,  गणेश नाईक यांना वनविभाग, माणिकराव कोकाटे यांना कृषी, प्रकाश आबिटकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, जयकुमार गोरे यांना ग्रामीण विकास आणि पंचायत राज, दादा भुसे यांना शालेय शिक्षण, संजय राठोड यांना मृदा आणि जलसंधारण, शंभुराज देसाई यांंना पर्यटन, नितेश राणे यांना बंदरे आणि मत्स्यव्यवसाय, दत्ता भरणे यांंना क्रीडा आणि युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक विकास, तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं (सार्वजनिक उपक्रम वगळून) देण्यात आलं आहे.

 

मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता, जयकुमार रावल यांना पणन आणि राजशिष्टाचार तसंच आदिवासी विकास, शंभूराज देसाई यांना खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय, तर आशिष शेलार हे माहिती आणि तंत्रज्ञान, सांस्कृतिक खात्याचे मंत्री असतील.

 

धनंजय मुंडे यांना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, पंकजा मुंडे यांना पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन, अतुल सावे यांना इतर मागासवर्गीय तसंच बहुजन कल्याण आणि दुग्धविकास, अपारंपरिक उर्जा अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास, नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन, विशेष सहाय्य संजय सावकारे यांच्याकडे वस्रोद्योग, संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग, प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन, भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास खातं देण्यात आलं आहे. 

 

मकरंद जाधव यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन, आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं देण्यात आलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा