डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभेतून समाजवादी पार्टीचे अबु आझमी निलंबित

समाजवादी पार्टीचे आमदार अबु असीम आझमी यांना चालू अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याबद्दल आझमी यांना निलंबित करावं असा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हरकत घेत आझमी यांचं सदस्यत्व विधानसभेच्या पूर्ण कालावधीसाठी रद्द करण्याची मागणी केली. मात्र सदस्यत्व कायमचं रद्द करणं नियमात बसत नसून यासाठी आमदारांची समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

 

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांच्या मागणीला पाठिंबा दिला,  तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या सर्वांवर अशीच कारवाई करणार का असा प्रश्न सरकारला विचारला. आझमी यांच्या वक्तव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान झाला असल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी घोषणा दिल्या. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष सुरू केला. यावर विरोधकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.

 

अबू आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत रद्द करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला.

 

विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, अबु आझमी यांच्याविरूद्ध आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

 

विधान परिषदेतही अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याच्या मुद्द्यावरुन   गदारोळ झाला. कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसचे भाई जगताप यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आझमी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. त्यानंतर दोन्ही बाजूचे सदस्य सभापती यांच्या समोरच्या जागेत घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे सभापतींनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा