राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भर्ती झालेली नाही असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भर्ती करण्यात आलेल्या शिक्षकांच्या इतर माध्यमांच्या शाळेमध्ये नियुक्ती केल्याबाबतचा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रिस नायकवडी यांनी उपस्थित केला होता, त्याला भुसे यांनी उत्तर दिलं.
खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते देण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही भुसे यांनी दिली. अमरावती विभागातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करण्याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना भुसे यांनी हे हप्ते येत्या ३१ तारखेपर्यंत दिले जातील असं आश्वस्त केलं.
शालेय शिक्षण विभाग संपूर्ण डिजिटल करण्याचा प्रयत्न असून ऑनलाइन निवृत्तिवेतन व्यवस्था प्रगतीपथावर असल्याचं भुसे यांनी सांगितलं.