महाराष्ट्रात धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असं कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ देण्याची मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली. यावर तपासून कार्यवाही करण्याचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. भैयाजी जोशी यांनी मुंबईत मराठी येणं आवश्यक नसल्याचं वक्तव्याचा उल्लेख करत सरकारची याबाबत भूमिका काय आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यानंतर आदित्य ठाकरे याच विषयावर बोलायला उभे राहिले असता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं सांगितलं.
मंत्री जयकुमार गोरे यांनी दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि यूट्यूबर तुषार खरात यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. या तिघांनी आपल्याविषयी अश्लील टिप्पणी केली असून यामुळे आपली बदनामी झाल्याचं गोरे म्हणाले. हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.