राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६ हजार ४८६ कोटी २० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आज दोन्ही सभागृहात सादर केल्या. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्या मांडल्या. त्यात सर्वाधिक ३ हजार कोटी रुपयांहून अधिक मागण्या ग्रामविकास विभागाच्या आहे. प्रधानमंत्री आवासन योजनेसाठी पावणे ४ हजार कोटी आणि मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजनेसाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद यात आहे. या मागण्यांवर ६ आणि ७ मार्च रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे.
विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका सदस्य म्हणून योगेश सागर, बबनराव लोणीकर, दिलीप बनकर, सुनील राऊत, अमित झनक यांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग तसंच प्रदीप जाधव नाईक, मुकुंदराव मानकर, उपेंद्र शेंडे, तुकाराम बिरकड यांना सर्व सदस्यांना आदरांजली वाहिली आणि सभागृहाचं कामकाज तहकूब झालं.
विधानपरिषदेत निरंजन डावखरे, चित्रा वाघ, कृपाल तुमाणे, अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि सुनील शिंदे यांची तालिका सदस्य म्हणून नेमणूक केल्याचं सभापती राम शिंदे यांनी जाहीर केलं.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी न्यायालयाचा निर्णय आल्यावर राज्यपाल किंवा विधानसभा निर्णय घेईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर सांगितलं. त्यानंतर विधानपरिषदेत मनमोहन सिंग यांच्यासह माजी सदस्य धनश्याम दुबे, नारायण वैद्य, सुभाष चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी सादर केला. शोक प्रस्ताव मंजूर केल्यावर विधान परिषदेचं कामकाजही उद्यापर्यंत तहकूब झालं.