महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित आज झालं. पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली. या पदासाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता.
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये राज्यातल्या ५० विकास योजना आणि पाच नगर रचना योजनांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली.
दिवसभराच्या कामकाजानंतर विधानसभेचं कामकाज संस्थगित झालं. पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. या अधिवेशनात १९ बैठका झाल्या. त्यात ९ विधेयकं मंजूर झाली. या अधिवेशनात एकूण १४६ तास कामकाज झालं, अशी माहिती अध्यक्षांनी दिली.
विधानपरिषदेचं कामकाजही आज संस्थगित झालं. या अधिवेशनात विधानपरिषदेचं कामकाज एकूण १५ तास ३६ मिनिटं झालं. रोज सरासरी ७ तास १३ मिनिटं कामकाज चाललं तर एकूण ५ तास ४५ मिनिटं वेळ वाया गेला. या अधिवेशनात विधानपरिषदेच्या पाच नव्या सदस्यांनी शपथ घेतली. या अधिवेशनात तीन शासकीय विधानपरिषद विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली, तीन विधेयके संमत झाली, चार विधानसभा विधेयके पारीत झाली तर पाच धन विधेयके कोणत्याही शिफारशीशिवाय विधानसभेकडे परत पाठवली.