विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. राज्यात जाती धर्माच्या आधारे अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेला सुरुवात करताना केली. कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे सरकारनं लक्ष द्यावं, महाराष्ट्राला संपवू नये, असं ते म्हणाले. औरंगजेबाची कबर उखडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करू नका. महाराजांच्या सोबत अनेक मुस्लिम मावळे काम करत होते हे लक्षात घ्या, या मुद्द्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन त्यांनी केलं.
यावेळी त्यांनी जनसुरक्षा कायद्याला विरोध केला. हा कायदा टाडा पेक्षा भयंकर आहे आणि राज्याला संपवणारा आहे असं ते म्हणाले. नर्सिंग कॉलेज मंजूर करण्याच्या नावाखाली राज्यात ४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.